Saturday, December 24, 2016

शिवस्मारक

पिवळी पुस्तके वाचुन इतिहासाबाबत विश्लेषण करणार्या लोकांना लोटांगण घालुन वंदन....
हे इतिहासकार कुठुन कुठुन शोध लावत असतात काय माहीत ...जगातल इतिहास संशोधन क्षेत्रातल एखाद नोबेल पारितोषिक यांना मिळायला कोणाची हरकत नसावी....

कालपासुन एक मँसेज वाचण्यात येतोय तो म्हणजे अरबी नको शिवसागर म्हणा .काही भांगाना नाव ही अंतरराष्ट्रीय पातळीवर भौगोलिक स्थानानुसार पडलेली आहे .. अरबी सागर हा भारत पाकीस्तान पासुन ते सोमालियापर्यंत  चाळीस लाख स्केवर कि.मी. एवढा पसरलेला आहे व त्या सागरात स्मारक होतय तर तुम्ही सगळा समुद्र बदलायला निघालेत ..कुठुन सुचत हे खुळ..

कालच एक पोस्ट पाहीली हात जोडलेली गोरे हात स्मायली ही भटाचे व काळे हात हे मुलनिवासीचे...गोर्या काळ्याचा भेदभाव मिटण्यासाठी जगभरातुन महापुरुष जन्मभर लडले व आज तुम्ही तोच भेद पसरवुन शातंता बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत...

शिवस्मारकाच्या आड गड व किल्ल्यांची संवर्धन करा म्हणुन टिका करणारे महाभाग ईतके दिवस काय झोपले होते का...खासदार आमदार तुमचेच, उबंरठे झिजवणारे तुमचेच....का नाही एकदाही केद्रांला जाब विचारला आतापर्यत... संवर्धनाच्या हाका झाडणारे जेव्हा पुतळे तोडुन गडावरुन खाली फेकुन दिले तेव्हा का गप्प बसलेत...फक्त पुरातन वास्तुची तोडफोड करुन ईतिहास मिटवता नाही येऊ शकत...

आज कोळीबांधव ज्या बांडगुळाच्या नेतृत्वाने फरफटत चाललाय त्याला दोन वर्षापुर्वी भाजपाने प्रवेश नाकारला होता व आज पण त्याला कोणी विचारत नाही. काही समस्या असतीलही तुमच्या तर त्यावरही बैठक घेऊन तोडगा निघु शकतो.

आज लोक शहाणी झालीय, चांगल वाईट फायदा तोटा सगळं कळत. तुमच ज्ञान पाजळण्याची काही गरज नाही. काही संघटना ह्या अतिरेक झाला का जनता आपोआप त्यांची जागा दाखवुन देते. फक्त वाईट एवढच वाटत का हे विष कालवणार्यांनां सराकार कारवाई न करता पाठीशी घालतय....

शिवाजी महाराजांच नाव घेऊन जाती जाती मध्ये घाणरड राजकारण करणार्यानो आता वेळ आलीय ...संकुचित बुध्दी ठेवुन बेडकासारखं वागण सोडुन द्या जग खुप सुदंर आहे फक्त डोळे ऊघडा...

Thursday, December 8, 2016

पोरीची मावशी...

काल चुलतभावाला मुलगी बघाया गेलतो....
पोरीची मावशी माझ्याकड बघत होती.....
आम्ही चार जण आणि तिकडचे सहाजण कसबस घरात अडजेस्ट केल....
आम्ही गेल्यावर उगाच आवसान आणुन गप्पा चालु होत्या....
चहाच पातेलं आणि  म्हतारी चागंलीच तापली होती....
पहाण्याचा कार्यक्रम झाल्यावर मोबाईलवर फोटोफोटी झाली....
दोन लहान बेमटी नुसती केकटत होती.....
पोरीची मावशी सारखी माझ्याकड बघत होती.....
मग न राहवुन मी स्वतःहुन बोललो लहान मुल लई खोडकर असतात माझी पण दीड वर्षाची मुलगी  अशीच आहे....
पोरीची मावशी माझ्याकड बघतच राहीली......

मन्या

राष्टगीतावरुन एक किस्सा आठवला.... पुर्वी पटांगणात राष्टगीताचा कार्यक्रम पार पडायचा.त्यात शाळा ही महापालीकेची असल्याने सफाई कामगार नावापुरताच.
शाळेत असताना प्राथना चालु झाली का चार मुले ही वर्गाची झाटलोट करायची नियम च तसा होता... चारपैकी तीन नेहमी बदलायची पण मन्या हा काही चार वर्ष बदलला नाही. मी म्हणायचो मन्या तुला काय राष्टगीताचं वावडं आहे का .तर तो बोलायचा तस नाहीरं पण मला अर्धा तास सतत ऊभं राहायचा कटांळा येतो...

आज.....

शाळेत शहीद जवानांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होता व मुख्याध्यापक मन्याच्या फोटोला हार घालुन वंदन करत होते.........

Saturday, November 5, 2016

धुर

दिवाळीच्या फटाक्यांनी
डोक नुसत
भिरभिरायला लागलय,
त्यात धुरान
संगळ वातावरण
प्रदुषित झालय,
मित्रा ला बोललो चल
थोड लांब
डोगंरावर जाऊन
फ्रेश हवा खाऊ,
मग काय
गाडी काढलीय
दुर माळावर
गेलोय
अर्धा खंबा
होताच सोबतीला
गाडीची म्युझिक
सिस्टम वुफर फुल करुन
हनी सिंगच
गाण ऐकतोय
त्यात सिगारेट
पेटवलीय
पेग हातात घेऊन
समोर शेकोटी
धुरांन डोळ लाल
झाल्यात
पण पेग पिताना
कसली शांतता
आणि
फ्रेश
वाटतय.
फिलींग आवसँम.....

Friday, November 4, 2016

भगव वादळ, निळ वादळ

भगव वादळ, निळ वादळ ,
खातय कुत्र आणि आंधळ दळ,
जातिवंत मीपणाचा ह्यांच्या डोक्यात,
घालुनी फिरती आयुष्य धोक्यात.
न राहो युवा ह्यांच्या पाठी,
कितीही तरी सोबतीला शेवटी काठी.
राजकारणापायी मांणस बिथरली,
न जाणो कधी झेंड्याखाली विसावली.
ईतिहासातील गमज्या मारण्यात आंनद,
हाच आमचा नाद आणि खुळाछंद.
जागा हो मानवा नको करु वेडेपणा,
बुध्दीला दे चालना आणि जान मना.
करुनी गेले महापुरुष समस्त वंदन तया,
समतेचा धर्म सोडुनी जाऊ नको वाया.

Monday, April 11, 2016

दास्तान-ए-आवारगी….Part 4

मी “सिक्स्टी राउंड” पळायला सुरुवात तर केली पण जे काही बघितलं होतं ते डोळ्यासमोर येत राहिलं..पाय डगमगत होते..श्वास नीट येत नव्हता..मराठे स्वत:च्या मनानं हे सर्व करत होती? एक्स्ट्रा व्यायाम करायची इतकी गरज होती?
मला एकदम फसवलं गेल्यासारखं वाटायला लागलं. सर तर वयानं खूप मोठे होते. तरीही हे असं?
तिलाही ते आवडत होतं का? असणार. नाहीतर ती कशाला स्वत:हून लवकर आली असती क्लासच्या आधीच? चॉईस होता तिला हे टाळायचा….
मग मी सात आठ दिवस मराठेशी एक शब्दही बोललो नाही. अगदी तिला जाणवेल इतकं अव्हॉईड केलं. माझा संताप झाला होता आणि विचार करून डोक्याचा चिखल. इथे एका वयाने दुप्पट मॅरीड माणसाच्या स्कँडल मध्ये ती अडकत होती. त्यापेक्षा जाधवचा प्रॉब्लेम बरा होता.
लई डाळ नासली सरांनी…एक तर माझ्या मनातल्या त्यांच्या इमेजला मोठा धक्का बसला होता. त्यातून मला आवडणा-या मुलीला ते घेऊन चालले होते.
मी नीट विचार करायला सुरुवात केली. तिला हे सर्व का आवडत असेल? मग माझ्या लक्षात आलं की मला एका मुलीसारखा विचार करता येत नाहीये. इतकं मात्र समजत होतं की तिला सरांकडून मिळणारं स्पेशल अटेन्शन आवडण्यासारखंच असणार. तिला चालू ठरवून मोकळं होणं सोपं आहे.. पण ती सुद्धा आपल्यासारखीच अर्धवट वयाची आहे. ती तर आपल्याहूनही लहान आहे. ती आपली आहे. आपल्याला आवडते तर मग तिला समजून घेताना इतका राग राग कशाला.
मग वाटलं..च्यामारी..असले भिकारचोट मॅच्युअर विचारच आपल्याला नेहमी खड्ड्यात घालतात. आलाय भडवा सर्वोदयवादी सर्वांना समजून घेणारा..
तो जाधव आणि ते सर..दोघेही असला विचार करतात का? ..आणि तरी मराठे त्यांच्याकडे आकर्षित होतेच ना?. मी मात्र बसलोय विचारमैथुन करत. कंचुकी साला.
“केळकर..लक्ष कुठंय?” गोड स्वर कानात शिरला. बघितलं तर केमिस्ट्रीच्या डेमॉन्स्ट्रेटर गोखले मॅडम..
आधीच मोमीनची आज दांडी होती. पार्टनर नसला की एकट्यानं प्रॅक्टिकलची शाटमारी करायला जिवावर येतं.
..साखरेच्या द्रावणाची पोलॅरिटी काढण्यासाठी पोलॅरिमीटरला डोळा लावून मी नुसताच बसलो होतो. ते बघून गोखले मॅडम मागे येऊन उभ्या राहिल्या होत्या.
“अं..हो.. चालू आहे रीडिंग..” मी म्हटलं..
“आणि साखरेचं सोल्युशन कुठे गेलं सगळं? प्यायलास की काय ?” त्या म्हणाल्या आणि हसायला लागल्या.
मला खूप बरं वाटलं..मी ही थोडा हसलो.
मी सर्वच पोरींकडे पवित्र दृष्टीनं पाहू शकत नाही. सख्खी बहीण मला नाही. बहीण म्हणून मी फक्त चुलत वगैरे बहिणींकडे बघू शकतो. कारण लहानपणापासून तशी सवय लागली आहे. पण तसं नसताना उगीच मानलेली बहीण हा प्रकार मला जमत नाही. मुळात असली फसवणूक मला करता येत नाही. जी मुलगी आकर्षक आहे तिच्या विषयी मला आकर्षणच वाटतं. मुली म्हणतात ना की “अरे मी तुझ्याकडे ‘तशा’ दृष्टीनं कधी बघितलेलं नाही.” खोटं असतं ते. त्याचा खरा अर्थ असतो ”मी तुझ्याकडे तशा दृष्टीनं पाहिलंय पण सॉरी.. जमत नाही..तू फेल”
मला नक्की माहीत आहे की पोरांचं आणि पोरींच लॉजिक एकच असतं.
आधी बाय डिफॉल्ट समोरच्याकडे “त्या”च दृष्टीनं बघायचं. जर भेटलेला पोरगा साधाबेन्द्रा, अनाकर्षक म्हणजे “तसा” नसलेला असेल किंवा भेटलेली पोरगी चिकणी आयटेम नसेल तर या सगळ्या बंधुभगिनीपणाच्या भावना येतात. मग बनवा बहीण आणि बांधून घ्या राखी. नाटक सालं सगळं.
माधुरी दीक्षित सारखी पोरगी आली कॉलेजात तर मानाल बहीण तिला? मरू दे ते, मराठेसारख्या सुंदर आणि गो-यागोमट्या पोरीला तरी कोणी बहीण मानेल? आणि आपल्याच वर्गात आयला ती बिचारी हेबळे जरा काळी आहे तर झाले सगळे तिचे भाऊ.
मेन सांगायचं म्हणजे आपण काही स्वामी विवेकानंद नाही बुवा.
गोखलेमॅडम पंचवीसच्याच होत्या . तरुण मुलगीच होती ती खरं तर. खूपच आकर्षक होत्या. आणि त्यांच्याकडे माझी नजर चोरून जायचीच. चोरून नाही बघितलं आणि राजरोस बघितलं तर मारच खायला लागेल म्हणून चोरून.
वाकून काही दाखवायला लागल्या की सगळीच पोरं आ करून बघत बसायची. टपाटपा जबडे निखळायचे सगळ्यांचे. इव्हन कोणी प्रोफेसर लॅबमध्ये उभे असतील तर ते ही बघायचे.
त्या हसल्या की छान वाटायचं. मग आजही तसंच वाटलं.
“अरे किती वेळ घेतोयस रीडिंग?” त्या परत म्हणाल्या. “तब्येत ठीक आहे न तुझी?” त्यांनी माझ्या कपाळाला हातच लावला.
हे मला आवडायचं. इतर गुरुजन आम्हा पोरांनाही अहो जाहो करायचे. पण गोखले मॅडम मैत्रीण असल्यासारख्या एकेरीत बोलायच्या. मोकळ्या वागायच्या.
“नाही मॅडम..फिट आहे एकदम मी. ते शुगर सोल्युशन जरा जास्त डायल्युट झालं चुकून. परत करतो.” मी म्हटलं.
“थांब मी पण येते हेल्प करायला. तू फक्त रीडिंग घे.” त्या म्हणाल्या “उशीर झालाय नं खूप..”
बाहेर बघितलं तर च्यायला अंधार व्हायला लागला होता. लॅब एकदम रिकामी.
गोखलेमॅडमसोबत मी एकटाच आहे या विचारानं मला एकदम थरथरल्यासारखं व्हायला लागलं. त्या पोलॅरिमीटरवर झुकल्या आणि बहुधा आयपीसच्या आतली रेष नीट आहे का ते बघायला लागल्या.
मला कळेना की एकदम इतकं अनिवार आकर्षण का होतंय. त्या म्हटलं तर गुरु, मेंटर, मार्गदर्शक होत्या. हे तर रोगट आकर्षण झालं ना?
मग माझ्या लक्षात आलं. आजचा पोलॅरिमीटरचा प्रयोग खूपच किचकट होता. गू घाण शेण प्रयोग तेच्या आयला. खूप खूप कच-यासारखी रीडिंग होती. एकही रीडिंग हवं त्या रेंजमध्ये येत नव्हतं. जर्नल कम्प्लिशन जवळ आली होती. डोक्याची आयमाय एक झाली होती. मला खरंच कोणीतरी मदत करण्याची गरज होती. गोखलेमॅडम नेमक्या त्या वेळी माझ्यासोबत होत्या आणि पुढे होऊन मला त्या गुंत्यातून सोडवत होत्या. मराठेमुळे मी हर्ट झालो होतो त्यावरही त्यांच्या गोड मोकळ्या हसण्यामुळे दुखरी पाठ चेपून दिल्यासारखा इफेक्ट होत होता.
मी ते आकर्षण एक्सेप्ट केलं. पुढे झालो. सर्व रीडिंग पूर्ण होईपर्यंत एक तास लागला. त्या वेळात खूपदा आम्ही एकमेकांना चिकटलो, टेकलो, एकमेकांना स्पर्श ही झाला.
बाकी फार काही नाही घडलं चंद्रलोकच्या अंकातल्यासारखं..म्हणजे रसरशीत ओठ, भरगच्च उरोज वगैरे.. पण एवढं नक्की झालं की लॅबमधून बाहेर पडताना मी मराठेचा सरांसोबतचा व्यायाम अनुभवला होता आणि तिला माफ केलं होतं. तिला आणि जाधवलाही. सरांना मात्र नाही. बांबूच लावणार होतो आयला त्याला.
आता मराठेला आत येता येईल इतका माझ्या मनाचा दरवाजा मोठ्ठा उघडला होता.
दुस-या दिवशी मी कराटे क्लास चुकवला. मोमीनच्या बाबांची सीडी हंड्रेड बाईक घेतली. गियर गाडीचं लायसन माझ्याकडे नव्हतं. पण आतून आतून फिरण्याच्या गल्ल्या मला छान माहीत होत्या. कराटे क्लास समोर बाईक लावून त्याच्या सीटवर बोचा टेकून उभा राहिलो. हातात सिगरेट नसूनही आता काही फरक पडत नव्हता. मला काळापहाड डिटेकटीव्ह सारखं स्टायलिश वाटत होतं.
क्लास सुटला. मराठे बाहेर आली. अंधार चांगलाच झाला होता.
मी मराठेला हाय केलं. तिनंही मला.
“जाधवनं तुला प्रपोज बिपोज नाही ना मारलेलं ?” मी थेट म्हणालो.
ती खूपच दचकली. मग एकदम सावरून म्हणाली, “ए. काहीतरी काय विचारतोस. शी..”
मी म्हटलं, “मग आता मला सगळ्यात आधी तुला सांगायचंय की मला तुझ्यात इंटरेस्ट आहे.”
ती अस्वस्थ झाली. खाली बघायला लागली. मग म्हणाली “वेडा झालायस का तू?”
“हो”, मी मुद्द्याचं आणि खरं म्हटलं, “येतेस बाईकवरून राइड्ला? अँड्र्यूपर्यंत?”
ती थोडीशी हसली. मीही.
“पण माझी सायकल आहे”, ती म्हणाली.
“टाक माझ्या घरी, येताना घेऊ.”
मी बाईक ढकलत आणि ती सायकल ढकलत असे चालत चालत माझ्या घरासमोर आलो. मराठे तिची सायकल आत ठेवत असताना ब्राउनं माझ्याकडे बघून आनंदानं “भूफ्फ” केलं. माझ्यासोबत पोरगी आलेली तो पहिल्यांदाच बघत होता.
मला अर्थ कळला. “होय..तिला घेऊन चाललोय फिरायला. तुला काय करायचंय रे भिकारचोटा. गप बस गुंडाळी करून..”, मी त्याला कुरवाळत हळूच म्हणालो.
ब्राउ कुइं करून खाली बसला.
बाईक स्टार्ट केली. ती स्टार्ट झाली हे मुख्य.
मराठेला म्हटलं, “बस मागे”
कराटेचा ड्रेस होता म्हणून की काय जाणे ती दोन्हीकडे पाय टाकून बसली. माझ्या सुटलेल्या आणि स्ट्रेच करताना मध्ये येणा-या त्याच त्या पोटाला तिनं एक हात, थोडा घट्टच, धरला.
गार वा-यात आम्ही कुत्र्यासारखे सूं सूं करत अँड्र्यूच्या “ओल्ड स्पाईसचा” वास काढत निघालो..
–oo—-oo– –oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo–
दि येंड..खतम..डाव बास..

दास्तान-ए-आवारगी...part three.

आता महिना दोन महिने कराटे बंद होणार होतं. मग मी ठरवलं की मराठेला सरळ बाहेर भेटायचं आणि हळूहळू विचारायचं..आणि सांगायचं. म्हणजे जाधवविषयी विचारायचं आणि स्वत:च्या फीलिंग विषयी सांगायचं.
मी एक दिवस मोडका हात गळ्यात घेऊन कराटे क्लासमध्ये गेलो. फरशांचा प्रकार तिथं सांगून उपयोग नव्हता. नुसताच ल्युनावरून पडलो असं सांगितलं. क्लास संपेपर्यंत तिथे बसून टाईमपास केला आणि मग परत येताना मराठेसोबत तिच्या घरापर्यंत चालत गेलो. तिला फरशांचं खरं खरं सांगितलं. ती इतकी गोड हसली की जसा मिल्कमेड कंडेन्स्ड मिल्कचा कॅन उघडून तोंडाला लावावा. मी स्वत:शी कबूल केलं की मी गेलोय. मला ती आवडली आहे. मला ती हवी आहे.
मी अगदी तिच्या घरापाशी तिला निरोप देताना म्हटलं, ” ए.. आनंदरावचं ओमलेट सँडविच खाल्लयंस ??”
ती म्हणाली “मला संध्याकाळी तिकडून येताना तिकडच्या खमंग वासानं खूप वाटतं की खावं एकदा तरी. पण ते संध्याकाळी अंधारातच चालू असतं नं?”
“अं. हो..” मी म्हणालो.
“तिथे मुली कोणीच नसतात नं. मग अंधारात एकटी कशी थांबणार मी..?”
मराठेलाही खेचू शकेल असं खमंग वासाचं मॅग्नेटिझम आपल्या आसपास तयार करू शकणा-या आनंदरावबद्दल मला एकदम प्रेम आलं. ओल्ड स्पाईसची व्यर्थता पटली.
“माझ्याबरोबर चल गं अँड्र्यूकडे ..मी घेऊन जातो तुला सुरक्षित..ल्युनावर तर ल्युनावर..चल..” असं सगळं माझ्या मनात भरभर आलं. पण मी वेळेवर डोकं चालवून म्हटलं, “तुला खायचंच असेल एकदा तर माझ्याबरोबर येऊ शकतेस. मी रोज जात असतो.
तुला एनीटाईम घेऊन जायला तयार आहे मी.”
ती गप्प बसली.
मग मला वाटलं फार सेफ खेळून साली संधीच जायची. म्हणून मी मनाचा “रिझर्व्ह हिय्याफोर्स” बाहेर काढला आणि म्हटलं, ” मग उद्या जाऊ या? क्लास नंतर?”
“हं..” असे गोड शब्द कानावर पडले. आणि मिल्कमेडचा शेवटचा लपका अशी एक छोटीशी स्माईल देऊन ती निघून गेली. मिल्कमेडचा कॅन संपला होता. पण तरी आता मी घरी जाऊन तो रात्रभर चाटत बसणार होतो. जीभ कापेपर्यंत.
दुस-या दिवशी मी सकाळपासून पिसासारखा तरंगत हवेत उडत सगळं काही करत होतो. दुपारी लॅबमध्ये सोडियम भरलेल्या दोन टेस्ट ट्यूब बोटांमध्ये पकडलेल्या असताना नळाखाली माझा धड अवस्थेतला हात धरला.
फडाड फाड असे आवाज येऊन बोटं एकदम भाजली तेव्हा कळलं की सोडियममध्ये पाणी मिक्स झालंय. मग ते फडफडणारे गोळे बेसिनमध्ये टाकले. तिथे आत्ताच मोमीननं इथेनॉल ओतलं होतं. त्यामुळे पूर्ण बेसिन भरून भडका उडाला. यज्ञकुंड तयार झालं. गुटखाथुंकर एच.ओ.डी तिकडून ओरडत आला. मी ऐकून घेतलं. कशात लक्षच नव्हतं तर काय करणार..
“खायचा” प्लास्टरमध्ये आणि “धुवायचा” भाजलेला अशी अवस्था..यातलं खरं दु:ख, मला उद्या सकाळी जाणवणार होतं. पण उद्याचं उद्या.. आजची सुंदर संध्याकाळ त्याच्याही आधी होती.
कराटेचा क्लास सुटला तेव्हा मी एका हातानं ब्राउ ची साखळी पकडून तिच्या वाटेत उभा राहिलो. एक तर आमचा ब्राउ दिमाखदार दिसायचा त्यामुळे इम्प्रेशन पडायचं. ..आणि त्याला घरी परत सोडायच्या निमित्तानं मला तिला घरी आणायचं होतं.
ती बाहेर आली आणि मला बघून गोड “हाय” केला. नेमका त्याच क्षणी ब्राउनं खाली शी केली. मला तोंडघशी पाडण्यात ब्राउ कधीच कमी पडला नाहीये.
ती परत हसली. थोडंसं तोंड दाबून आणि अर्थातच नाक दाबून.
“चल जाऊया”, मी तिला म्हणालो.
आम्ही ब्राउ ला घरी सोडलं आणि चालतच अँड्र्यू मठाकडे निघालो. अंधार झालाच होता. हळू हळू अस्वस्थ वाटत होतं आणि छानही.
मग मी सरळ विचारलं, “ए तो जाधव तुला त्रास नाहीये नं देत?”
ती म्हणाली “नाही. तो नुसताच काहीतरी विचारत बसतो.”
“काय विचारतो ? आय मीन तो काही फार चांगला मुलगा नाही आहे..म्हणून म्हटलं. मी ताईला पण सांगणारच होतो तुझ्या. पण भेटच झाली नाही.”
“…”
मी म्हटलं, “तुला नसेल कम्फर्टेबल वाटत बोलायला तर असू दे..”
मग हवेत एकदम खड्डा तयार झाला. आता काय बोलायचं ?
मी विषय काढला, “मलाही धमकी दिलीन त्यानं”
“धमकी ? कशासाठी?”
“ते मी तुला बेस्ट लक द्यायला आलो होतो नं..त्यावेळेला.. उम..तो विचारात होता की माझं तुझ्याशी काही आहे का म्हणून..”
“मग तू काय म्हणालास..?”
मी दचकलो…आयला..झाला बल्ल्या… मी काय म्हणालो ते कसं सांगणार? आता काहीतरी सांगून तिला घुमवायला हवं होतं..
“मी सांगितलं की तू तिच्यामागे लागू नकोस म्हणून..”
आता तिलाही खोदून खोदून विचारता येईना की मी त्यावेळी काय म्हणालो होतो आमच्या दोघांच्या विषयी.
संभाषण ज्या पद्धतीनं चाललं होतं त्यामुळे मला टेन्शन यायला लागलं.
मग गप्प राहून ओमलेटची गाडी गाठली. अँड्र्यू संत प्रवृत्तीचा असूनही माझ्यासोबत मराठे आहे म्हटल्यावर बेडकासारखा बघत राहिला. मी त्याला दुरूनच बोटांनी “दोन” आणि परत “दोन” अशी खूण केली. म्हणजे दोन सँडविच आणि दोन चहा त्यानंतर.
एरव्ही मला चहा त्या तिखट सँडविचसोबत प्यायला मजा येते पण आज एकामागून एक मागवून मला थोडा वेळ मिळवायचा होता.
सँडविचचा एक मोठ्ठा घास घेतल्यावर तिच्या चेह-यावर स्वर्गसुख दिसलं. अँड्र्यूला आमच्या लग्नात बोलवायचं हे मी पक्कं केलं.
मग वाफाळत्या चहासोबत मी बोलायला तोंड उघडलं. तिला कांद्याचा वास येऊ नये म्हणून मी तिच्या डाव्या बाजूला दूर तोंड ठेवून बोलत होतो.
“तर मी मेन म्हणजे तुला हेच सांगणार होतो की तो तुला त्रास देऊ शकतो. चांगल्या ग्रुप मधला मुलगा नाहीये तो.” मी पुन्हा तेच म्हणालो.
“अरे पण तसा काही त्रास देत नाही तो. नुसता मित्र आहे. चांगला नीट बोलतो माझ्याशी..”
आयला…नीट तर मीही तिच्याशी बोलत होतो… मनातलं कळतंय का तुला माझ्या तरी ? अगं काय सांगू तुला. सगळी पोरं अशीच गोड बोलतात. छान वाटतात. फक्त शुद्ध मित्र-मैत्रीण असं नसतं गं बाई या वयात…आम्ही सगळे पुरुष वाईट असतो पोरगी पटवण्याच्या बाबतीत..
पण असं सगळं या शब्दात सांगणं अशक्य होतं..
“मला खूप छान वाटतंय आज तू आलीस म्हणून…”, मी माफक धाडसी विधान केलं.
ती नुसतीच हसली..पण ते असं की त्या हसण्यातूनच “का?” हा प्रश्न उमटावा.. पोरींनाच जमत असावं हे.
“नेहमी मी इथे परांजप्या किंवा कुठल्यातरी टोणग्यासोबत उभा असतो..”
“टोणग्या बरोबर?.. मग आज काय म्हशीबरोबर उभा आहेस का? चेंज म्हणून?” ती म्हणाली आणि खिदीखिदी हसत सुटली.
आयला सेन्स ऑफ ह्युमर पण. . मला हवी ही…कायमची.
“रोज ये ना अशीच..” मी थोडा लाडात आलो.
ती पुन्हा हसली.
“मला खरोखरची जाडी म्हैस बनवणार आहेस की काय रोज खायला घालून?” ती म्हणाली.
मग मी हसलो.
हसण्याचं टेबल टेनिस चालू झालं..
परत येताना तिनं मला तिच्या बॅगमधून एक इक्लेअर काढून दिलं. मी थँक यू म्हणताना नकळत माझा धड हात पुढे केला आणि तिनंही तो हातात घेतला. म्हटलं तर नॉर्मल शेकहँड, म्हटलं तर स्पर्श. खूप मऊ. गरम..
“ताप आहे का तुला?”, मी एकदम म्हटलं.
“नाही रे..”
“…”
“…….”
“जाणार आता तू?”
“हं..”
“आय विल मिस यू..”, मी स्वत:ला म्हणताना ऐकलं..
ती हसली आणि जिन्यानं वर चढून घरी निघून गेली.
तिच्या घरापासून माझ्या घरापर्यंत जे काही अंतर आहे ते मी चालत, उडत किंवा कशा त-हेनं पार करून माझ्या घरी आलो आणि कसा, कुठून आलो ते मला तेव्हा किंवा पुढं कधीच आठवलं नाही. इक्लेअरचं कव्हर माझ्या खोलीतल्या माझ्या खास लॉकरमध्ये गेलं.
त्या नंतर पंधरा दिवसांनी प्लास्टर निघालं. मी लगेच कराटे क्लास मध्ये हजर झालो. पहिला दिवस म्हणून क्लासच्या आधीच एक तास तिथे पोहोचलो.
क्लासच्या ग्राउंडवर सगळीच मोकळी जागा होती. पण एक शेड एका कोप-यात बांधलेली होती. कोणीतरी राखणीला कायम तिथे राहणं गरजेचं असल्यामुळे. त्या शेडमध्ये सर स्वत: व्यायाम करायचे. किंवा ध्यान धारणा..
सगळीकडे शुकशुकाट होता. मग मी जाळीतून शेडमध्ये डोकावलो. सर आणि मराठे दोघेच आत होते. तसे तर ते व्यायाम करत होते. पण एकत्र करण्याचे व्यायाम. मी तसाच उभा राहिलो आणि बघितलं तर सर बनियनवर होते आणि मराठेचे हात पकडून स्ट्रेचेस करून घेत होते. मग त्यांनी जमिनीवर बसून एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बेंड करण्याचे व्यायाम चालू केले.
मी खूप अस्वस्थ होत होतो. सरांचा खूप निकट स्पर्श तिला होत होता. साला मठाधिपती बुवा हरामी..
पुढचा एक्सरसाईझ जवळ जवळ मिठी मारल्यासारखा होता. यापुढे मला सहन होईना.
“सर”.. मी हाक मारली.
“कोण आहे” रागीट आवाज आला.
मी “कोण आहे” ते सांगितलं..
“जा ग्राउंडला सिक्स्टी राउंड मार..स्टार्ट..”
अँ? मला ही कसली शिक्षा? लवकर आल्याची ?
To be continued..