मी “सिक्स्टी राउंड” पळायला सुरुवात तर केली पण जे काही बघितलं होतं ते डोळ्यासमोर येत राहिलं..पाय डगमगत होते..श्वास नीट येत नव्हता..मराठे स्वत:च्या मनानं हे सर्व करत होती? एक्स्ट्रा व्यायाम करायची इतकी गरज होती?
मला एकदम फसवलं गेल्यासारखं वाटायला लागलं. सर तर वयानं खूप मोठे होते. तरीही हे असं?
तिलाही ते आवडत होतं का? असणार. नाहीतर ती कशाला स्वत:हून लवकर आली असती क्लासच्या आधीच? चॉईस होता तिला हे टाळायचा….
मग मी सात आठ दिवस मराठेशी एक शब्दही बोललो नाही. अगदी तिला जाणवेल इतकं अव्हॉईड केलं. माझा संताप झाला होता आणि विचार करून डोक्याचा चिखल. इथे एका वयाने दुप्पट मॅरीड माणसाच्या स्कँडल मध्ये ती अडकत होती. त्यापेक्षा जाधवचा प्रॉब्लेम बरा होता.
लई डाळ नासली सरांनी…एक तर माझ्या मनातल्या त्यांच्या इमेजला मोठा धक्का बसला होता. त्यातून मला आवडणा-या मुलीला ते घेऊन चालले होते.
मी नीट विचार करायला सुरुवात केली. तिला हे सर्व का आवडत असेल? मग माझ्या लक्षात आलं की मला एका मुलीसारखा विचार करता येत नाहीये. इतकं मात्र समजत होतं की तिला सरांकडून मिळणारं स्पेशल अटेन्शन आवडण्यासारखंच असणार. तिला चालू ठरवून मोकळं होणं सोपं आहे.. पण ती सुद्धा आपल्यासारखीच अर्धवट वयाची आहे. ती तर आपल्याहूनही लहान आहे. ती आपली आहे. आपल्याला आवडते तर मग तिला समजून घेताना इतका राग राग कशाला.
मग वाटलं..च्यामारी..असले भिकारचोट मॅच्युअर विचारच आपल्याला नेहमी खड्ड्यात घालतात. आलाय भडवा सर्वोदयवादी सर्वांना समजून घेणारा..
तो जाधव आणि ते सर..दोघेही असला विचार करतात का? ..आणि तरी मराठे त्यांच्याकडे आकर्षित होतेच ना?. मी मात्र बसलोय विचारमैथुन करत. कंचुकी साला.
“केळकर..लक्ष कुठंय?” गोड स्वर कानात शिरला. बघितलं तर केमिस्ट्रीच्या डेमॉन्स्ट्रेटर गोखले मॅडम..
आधीच मोमीनची आज दांडी होती. पार्टनर नसला की एकट्यानं प्रॅक्टिकलची शाटमारी करायला जिवावर येतं.
..साखरेच्या द्रावणाची पोलॅरिटी काढण्यासाठी पोलॅरिमीटरला डोळा लावून मी नुसताच बसलो होतो. ते बघून गोखले मॅडम मागे येऊन उभ्या राहिल्या होत्या.
“अं..हो.. चालू आहे रीडिंग..” मी म्हटलं..
“आणि साखरेचं सोल्युशन कुठे गेलं सगळं? प्यायलास की काय ?” त्या म्हणाल्या आणि हसायला लागल्या.
मला खूप बरं वाटलं..मी ही थोडा हसलो.
मी सर्वच पोरींकडे पवित्र दृष्टीनं पाहू शकत नाही. सख्खी बहीण मला नाही. बहीण म्हणून मी फक्त चुलत वगैरे बहिणींकडे बघू शकतो. कारण लहानपणापासून तशी सवय लागली आहे. पण तसं नसताना उगीच मानलेली बहीण हा प्रकार मला जमत नाही. मुळात असली फसवणूक मला करता येत नाही. जी मुलगी आकर्षक आहे तिच्या विषयी मला आकर्षणच वाटतं. मुली म्हणतात ना की “अरे मी तुझ्याकडे ‘तशा’ दृष्टीनं कधी बघितलेलं नाही.” खोटं असतं ते. त्याचा खरा अर्थ असतो ”मी तुझ्याकडे तशा दृष्टीनं पाहिलंय पण सॉरी.. जमत नाही..तू फेल”
मला नक्की माहीत आहे की पोरांचं आणि पोरींच लॉजिक एकच असतं.
आधी बाय डिफॉल्ट समोरच्याकडे “त्या”च दृष्टीनं बघायचं. जर भेटलेला पोरगा साधाबेन्द्रा, अनाकर्षक म्हणजे “तसा” नसलेला असेल किंवा भेटलेली पोरगी चिकणी आयटेम नसेल तर या सगळ्या बंधुभगिनीपणाच्या भावना येतात. मग बनवा बहीण आणि बांधून घ्या राखी. नाटक सालं सगळं.
माधुरी दीक्षित सारखी पोरगी आली कॉलेजात तर मानाल बहीण तिला? मरू दे ते, मराठेसारख्या सुंदर आणि गो-यागोमट्या पोरीला तरी कोणी बहीण मानेल? आणि आपल्याच वर्गात आयला ती बिचारी हेबळे जरा काळी आहे तर झाले सगळे तिचे भाऊ.
मेन सांगायचं म्हणजे आपण काही स्वामी विवेकानंद नाही बुवा.
गोखलेमॅडम पंचवीसच्याच होत्या . तरुण मुलगीच होती ती खरं तर. खूपच आकर्षक होत्या. आणि त्यांच्याकडे माझी नजर चोरून जायचीच. चोरून नाही बघितलं आणि राजरोस बघितलं तर मारच खायला लागेल म्हणून चोरून.
वाकून काही दाखवायला लागल्या की सगळीच पोरं आ करून बघत बसायची. टपाटपा जबडे निखळायचे सगळ्यांचे. इव्हन कोणी प्रोफेसर लॅबमध्ये उभे असतील तर ते ही बघायचे.
त्या हसल्या की छान वाटायचं. मग आजही तसंच वाटलं.
“अरे किती वेळ घेतोयस रीडिंग?” त्या परत म्हणाल्या. “तब्येत ठीक आहे न तुझी?” त्यांनी माझ्या कपाळाला हातच लावला.
हे मला आवडायचं. इतर गुरुजन आम्हा पोरांनाही अहो जाहो करायचे. पण गोखले मॅडम मैत्रीण असल्यासारख्या एकेरीत बोलायच्या. मोकळ्या वागायच्या.
“नाही मॅडम..फिट आहे एकदम मी. ते शुगर सोल्युशन जरा जास्त डायल्युट झालं चुकून. परत करतो.” मी म्हटलं.
“थांब मी पण येते हेल्प करायला. तू फक्त रीडिंग घे.” त्या म्हणाल्या “उशीर झालाय नं खूप..”
बाहेर बघितलं तर च्यायला अंधार व्हायला लागला होता. लॅब एकदम रिकामी.
गोखलेमॅडमसोबत मी एकटाच आहे या विचारानं मला एकदम थरथरल्यासारखं व्हायला लागलं. त्या पोलॅरिमीटरवर झुकल्या आणि बहुधा आयपीसच्या आतली रेष नीट आहे का ते बघायला लागल्या.
मला कळेना की एकदम इतकं अनिवार आकर्षण का होतंय. त्या म्हटलं तर गुरु, मेंटर, मार्गदर्शक होत्या. हे तर रोगट आकर्षण झालं ना?
मग माझ्या लक्षात आलं. आजचा पोलॅरिमीटरचा प्रयोग खूपच किचकट होता. गू घाण शेण प्रयोग तेच्या आयला. खूप खूप कच-यासारखी रीडिंग होती. एकही रीडिंग हवं त्या रेंजमध्ये येत नव्हतं. जर्नल कम्प्लिशन जवळ आली होती. डोक्याची आयमाय एक झाली होती. मला खरंच कोणीतरी मदत करण्याची गरज होती. गोखलेमॅडम नेमक्या त्या वेळी माझ्यासोबत होत्या आणि पुढे होऊन मला त्या गुंत्यातून सोडवत होत्या. मराठेमुळे मी हर्ट झालो होतो त्यावरही त्यांच्या गोड मोकळ्या हसण्यामुळे दुखरी पाठ चेपून दिल्यासारखा इफेक्ट होत होता.
मी ते आकर्षण एक्सेप्ट केलं. पुढे झालो. सर्व रीडिंग पूर्ण होईपर्यंत एक तास लागला. त्या वेळात खूपदा आम्ही एकमेकांना चिकटलो, टेकलो, एकमेकांना स्पर्श ही झाला.
बाकी फार काही नाही घडलं चंद्रलोकच्या अंकातल्यासारखं..म्हणजे रसरशीत ओठ, भरगच्च उरोज वगैरे.. पण एवढं नक्की झालं की लॅबमधून बाहेर पडताना मी मराठेचा सरांसोबतचा व्यायाम अनुभवला होता आणि तिला माफ केलं होतं. तिला आणि जाधवलाही. सरांना मात्र नाही. बांबूच लावणार होतो आयला त्याला.
आता मराठेला आत येता येईल इतका माझ्या मनाचा दरवाजा मोठ्ठा उघडला होता.
दुस-या दिवशी मी कराटे क्लास चुकवला. मोमीनच्या बाबांची सीडी हंड्रेड बाईक घेतली. गियर गाडीचं लायसन माझ्याकडे नव्हतं. पण आतून आतून फिरण्याच्या गल्ल्या मला छान माहीत होत्या. कराटे क्लास समोर बाईक लावून त्याच्या सीटवर बोचा टेकून उभा राहिलो. हातात सिगरेट नसूनही आता काही फरक पडत नव्हता. मला काळापहाड डिटेकटीव्ह सारखं स्टायलिश वाटत होतं.
क्लास सुटला. मराठे बाहेर आली. अंधार चांगलाच झाला होता.
मी मराठेला हाय केलं. तिनंही मला.
“जाधवनं तुला प्रपोज बिपोज नाही ना मारलेलं ?” मी थेट म्हणालो.
ती खूपच दचकली. मग एकदम सावरून म्हणाली, “ए. काहीतरी काय विचारतोस. शी..”
मी म्हटलं, “मग आता मला सगळ्यात आधी तुला सांगायचंय की मला तुझ्यात इंटरेस्ट आहे.”
ती अस्वस्थ झाली. खाली बघायला लागली. मग म्हणाली “वेडा झालायस का तू?”
“हो”, मी मुद्द्याचं आणि खरं म्हटलं, “येतेस बाईकवरून राइड्ला? अँड्र्यूपर्यंत?”
ती थोडीशी हसली. मीही.
“पण माझी सायकल आहे”, ती म्हणाली.
“टाक माझ्या घरी, येताना घेऊ.”
मी बाईक ढकलत आणि ती सायकल ढकलत असे चालत चालत माझ्या घरासमोर आलो. मराठे तिची सायकल आत ठेवत असताना ब्राउनं माझ्याकडे बघून आनंदानं “भूफ्फ” केलं. माझ्यासोबत पोरगी आलेली तो पहिल्यांदाच बघत होता.
मला अर्थ कळला. “होय..तिला घेऊन चाललोय फिरायला. तुला काय करायचंय रे भिकारचोटा. गप बस गुंडाळी करून..”, मी त्याला कुरवाळत हळूच म्हणालो.
ब्राउ कुइं करून खाली बसला.
बाईक स्टार्ट केली. ती स्टार्ट झाली हे मुख्य.
मराठेला म्हटलं, “बस मागे”
कराटेचा ड्रेस होता म्हणून की काय जाणे ती दोन्हीकडे पाय टाकून बसली. माझ्या सुटलेल्या आणि स्ट्रेच करताना मध्ये येणा-या त्याच त्या पोटाला तिनं एक हात, थोडा घट्टच, धरला.
गार वा-यात आम्ही कुत्र्यासारखे सूं सूं करत अँड्र्यूच्या “ओल्ड स्पाईसचा” वास काढत निघालो..
–oo—-oo– –oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo—-oo–
दि येंड..खतम..डाव बास..
Monday, April 11, 2016
दास्तान-ए-आवारगी….Part 4
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment