Monday, April 11, 2016

दास्तान-ए-आवारगी...part three.

आता महिना दोन महिने कराटे बंद होणार होतं. मग मी ठरवलं की मराठेला सरळ बाहेर भेटायचं आणि हळूहळू विचारायचं..आणि सांगायचं. म्हणजे जाधवविषयी विचारायचं आणि स्वत:च्या फीलिंग विषयी सांगायचं.
मी एक दिवस मोडका हात गळ्यात घेऊन कराटे क्लासमध्ये गेलो. फरशांचा प्रकार तिथं सांगून उपयोग नव्हता. नुसताच ल्युनावरून पडलो असं सांगितलं. क्लास संपेपर्यंत तिथे बसून टाईमपास केला आणि मग परत येताना मराठेसोबत तिच्या घरापर्यंत चालत गेलो. तिला फरशांचं खरं खरं सांगितलं. ती इतकी गोड हसली की जसा मिल्कमेड कंडेन्स्ड मिल्कचा कॅन उघडून तोंडाला लावावा. मी स्वत:शी कबूल केलं की मी गेलोय. मला ती आवडली आहे. मला ती हवी आहे.
मी अगदी तिच्या घरापाशी तिला निरोप देताना म्हटलं, ” ए.. आनंदरावचं ओमलेट सँडविच खाल्लयंस ??”
ती म्हणाली “मला संध्याकाळी तिकडून येताना तिकडच्या खमंग वासानं खूप वाटतं की खावं एकदा तरी. पण ते संध्याकाळी अंधारातच चालू असतं नं?”
“अं. हो..” मी म्हणालो.
“तिथे मुली कोणीच नसतात नं. मग अंधारात एकटी कशी थांबणार मी..?”
मराठेलाही खेचू शकेल असं खमंग वासाचं मॅग्नेटिझम आपल्या आसपास तयार करू शकणा-या आनंदरावबद्दल मला एकदम प्रेम आलं. ओल्ड स्पाईसची व्यर्थता पटली.
“माझ्याबरोबर चल गं अँड्र्यूकडे ..मी घेऊन जातो तुला सुरक्षित..ल्युनावर तर ल्युनावर..चल..” असं सगळं माझ्या मनात भरभर आलं. पण मी वेळेवर डोकं चालवून म्हटलं, “तुला खायचंच असेल एकदा तर माझ्याबरोबर येऊ शकतेस. मी रोज जात असतो.
तुला एनीटाईम घेऊन जायला तयार आहे मी.”
ती गप्प बसली.
मग मला वाटलं फार सेफ खेळून साली संधीच जायची. म्हणून मी मनाचा “रिझर्व्ह हिय्याफोर्स” बाहेर काढला आणि म्हटलं, ” मग उद्या जाऊ या? क्लास नंतर?”
“हं..” असे गोड शब्द कानावर पडले. आणि मिल्कमेडचा शेवटचा लपका अशी एक छोटीशी स्माईल देऊन ती निघून गेली. मिल्कमेडचा कॅन संपला होता. पण तरी आता मी घरी जाऊन तो रात्रभर चाटत बसणार होतो. जीभ कापेपर्यंत.
दुस-या दिवशी मी सकाळपासून पिसासारखा तरंगत हवेत उडत सगळं काही करत होतो. दुपारी लॅबमध्ये सोडियम भरलेल्या दोन टेस्ट ट्यूब बोटांमध्ये पकडलेल्या असताना नळाखाली माझा धड अवस्थेतला हात धरला.
फडाड फाड असे आवाज येऊन बोटं एकदम भाजली तेव्हा कळलं की सोडियममध्ये पाणी मिक्स झालंय. मग ते फडफडणारे गोळे बेसिनमध्ये टाकले. तिथे आत्ताच मोमीननं इथेनॉल ओतलं होतं. त्यामुळे पूर्ण बेसिन भरून भडका उडाला. यज्ञकुंड तयार झालं. गुटखाथुंकर एच.ओ.डी तिकडून ओरडत आला. मी ऐकून घेतलं. कशात लक्षच नव्हतं तर काय करणार..
“खायचा” प्लास्टरमध्ये आणि “धुवायचा” भाजलेला अशी अवस्था..यातलं खरं दु:ख, मला उद्या सकाळी जाणवणार होतं. पण उद्याचं उद्या.. आजची सुंदर संध्याकाळ त्याच्याही आधी होती.
कराटेचा क्लास सुटला तेव्हा मी एका हातानं ब्राउ ची साखळी पकडून तिच्या वाटेत उभा राहिलो. एक तर आमचा ब्राउ दिमाखदार दिसायचा त्यामुळे इम्प्रेशन पडायचं. ..आणि त्याला घरी परत सोडायच्या निमित्तानं मला तिला घरी आणायचं होतं.
ती बाहेर आली आणि मला बघून गोड “हाय” केला. नेमका त्याच क्षणी ब्राउनं खाली शी केली. मला तोंडघशी पाडण्यात ब्राउ कधीच कमी पडला नाहीये.
ती परत हसली. थोडंसं तोंड दाबून आणि अर्थातच नाक दाबून.
“चल जाऊया”, मी तिला म्हणालो.
आम्ही ब्राउ ला घरी सोडलं आणि चालतच अँड्र्यू मठाकडे निघालो. अंधार झालाच होता. हळू हळू अस्वस्थ वाटत होतं आणि छानही.
मग मी सरळ विचारलं, “ए तो जाधव तुला त्रास नाहीये नं देत?”
ती म्हणाली “नाही. तो नुसताच काहीतरी विचारत बसतो.”
“काय विचारतो ? आय मीन तो काही फार चांगला मुलगा नाही आहे..म्हणून म्हटलं. मी ताईला पण सांगणारच होतो तुझ्या. पण भेटच झाली नाही.”
“…”
मी म्हटलं, “तुला नसेल कम्फर्टेबल वाटत बोलायला तर असू दे..”
मग हवेत एकदम खड्डा तयार झाला. आता काय बोलायचं ?
मी विषय काढला, “मलाही धमकी दिलीन त्यानं”
“धमकी ? कशासाठी?”
“ते मी तुला बेस्ट लक द्यायला आलो होतो नं..त्यावेळेला.. उम..तो विचारात होता की माझं तुझ्याशी काही आहे का म्हणून..”
“मग तू काय म्हणालास..?”
मी दचकलो…आयला..झाला बल्ल्या… मी काय म्हणालो ते कसं सांगणार? आता काहीतरी सांगून तिला घुमवायला हवं होतं..
“मी सांगितलं की तू तिच्यामागे लागू नकोस म्हणून..”
आता तिलाही खोदून खोदून विचारता येईना की मी त्यावेळी काय म्हणालो होतो आमच्या दोघांच्या विषयी.
संभाषण ज्या पद्धतीनं चाललं होतं त्यामुळे मला टेन्शन यायला लागलं.
मग गप्प राहून ओमलेटची गाडी गाठली. अँड्र्यू संत प्रवृत्तीचा असूनही माझ्यासोबत मराठे आहे म्हटल्यावर बेडकासारखा बघत राहिला. मी त्याला दुरूनच बोटांनी “दोन” आणि परत “दोन” अशी खूण केली. म्हणजे दोन सँडविच आणि दोन चहा त्यानंतर.
एरव्ही मला चहा त्या तिखट सँडविचसोबत प्यायला मजा येते पण आज एकामागून एक मागवून मला थोडा वेळ मिळवायचा होता.
सँडविचचा एक मोठ्ठा घास घेतल्यावर तिच्या चेह-यावर स्वर्गसुख दिसलं. अँड्र्यूला आमच्या लग्नात बोलवायचं हे मी पक्कं केलं.
मग वाफाळत्या चहासोबत मी बोलायला तोंड उघडलं. तिला कांद्याचा वास येऊ नये म्हणून मी तिच्या डाव्या बाजूला दूर तोंड ठेवून बोलत होतो.
“तर मी मेन म्हणजे तुला हेच सांगणार होतो की तो तुला त्रास देऊ शकतो. चांगल्या ग्रुप मधला मुलगा नाहीये तो.” मी पुन्हा तेच म्हणालो.
“अरे पण तसा काही त्रास देत नाही तो. नुसता मित्र आहे. चांगला नीट बोलतो माझ्याशी..”
आयला…नीट तर मीही तिच्याशी बोलत होतो… मनातलं कळतंय का तुला माझ्या तरी ? अगं काय सांगू तुला. सगळी पोरं अशीच गोड बोलतात. छान वाटतात. फक्त शुद्ध मित्र-मैत्रीण असं नसतं गं बाई या वयात…आम्ही सगळे पुरुष वाईट असतो पोरगी पटवण्याच्या बाबतीत..
पण असं सगळं या शब्दात सांगणं अशक्य होतं..
“मला खूप छान वाटतंय आज तू आलीस म्हणून…”, मी माफक धाडसी विधान केलं.
ती नुसतीच हसली..पण ते असं की त्या हसण्यातूनच “का?” हा प्रश्न उमटावा.. पोरींनाच जमत असावं हे.
“नेहमी मी इथे परांजप्या किंवा कुठल्यातरी टोणग्यासोबत उभा असतो..”
“टोणग्या बरोबर?.. मग आज काय म्हशीबरोबर उभा आहेस का? चेंज म्हणून?” ती म्हणाली आणि खिदीखिदी हसत सुटली.
आयला सेन्स ऑफ ह्युमर पण. . मला हवी ही…कायमची.
“रोज ये ना अशीच..” मी थोडा लाडात आलो.
ती पुन्हा हसली.
“मला खरोखरची जाडी म्हैस बनवणार आहेस की काय रोज खायला घालून?” ती म्हणाली.
मग मी हसलो.
हसण्याचं टेबल टेनिस चालू झालं..
परत येताना तिनं मला तिच्या बॅगमधून एक इक्लेअर काढून दिलं. मी थँक यू म्हणताना नकळत माझा धड हात पुढे केला आणि तिनंही तो हातात घेतला. म्हटलं तर नॉर्मल शेकहँड, म्हटलं तर स्पर्श. खूप मऊ. गरम..
“ताप आहे का तुला?”, मी एकदम म्हटलं.
“नाही रे..”
“…”
“…….”
“जाणार आता तू?”
“हं..”
“आय विल मिस यू..”, मी स्वत:ला म्हणताना ऐकलं..
ती हसली आणि जिन्यानं वर चढून घरी निघून गेली.
तिच्या घरापासून माझ्या घरापर्यंत जे काही अंतर आहे ते मी चालत, उडत किंवा कशा त-हेनं पार करून माझ्या घरी आलो आणि कसा, कुठून आलो ते मला तेव्हा किंवा पुढं कधीच आठवलं नाही. इक्लेअरचं कव्हर माझ्या खोलीतल्या माझ्या खास लॉकरमध्ये गेलं.
त्या नंतर पंधरा दिवसांनी प्लास्टर निघालं. मी लगेच कराटे क्लास मध्ये हजर झालो. पहिला दिवस म्हणून क्लासच्या आधीच एक तास तिथे पोहोचलो.
क्लासच्या ग्राउंडवर सगळीच मोकळी जागा होती. पण एक शेड एका कोप-यात बांधलेली होती. कोणीतरी राखणीला कायम तिथे राहणं गरजेचं असल्यामुळे. त्या शेडमध्ये सर स्वत: व्यायाम करायचे. किंवा ध्यान धारणा..
सगळीकडे शुकशुकाट होता. मग मी जाळीतून शेडमध्ये डोकावलो. सर आणि मराठे दोघेच आत होते. तसे तर ते व्यायाम करत होते. पण एकत्र करण्याचे व्यायाम. मी तसाच उभा राहिलो आणि बघितलं तर सर बनियनवर होते आणि मराठेचे हात पकडून स्ट्रेचेस करून घेत होते. मग त्यांनी जमिनीवर बसून एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बेंड करण्याचे व्यायाम चालू केले.
मी खूप अस्वस्थ होत होतो. सरांचा खूप निकट स्पर्श तिला होत होता. साला मठाधिपती बुवा हरामी..
पुढचा एक्सरसाईझ जवळ जवळ मिठी मारल्यासारखा होता. यापुढे मला सहन होईना.
“सर”.. मी हाक मारली.
“कोण आहे” रागीट आवाज आला.
मी “कोण आहे” ते सांगितलं..
“जा ग्राउंडला सिक्स्टी राउंड मार..स्टार्ट..”
अँ? मला ही कसली शिक्षा? लवकर आल्याची ?
To be continued..

No comments:

Post a Comment