Monday, April 11, 2016

दास्तान-ए-आवारगी..ब्लॉगवरुन

मराठेचं जाधवशी जमताना बघणं मला शक्यच नव्हतं. तसं माझं मराठेशी अजून जास्त काही नव्हतं पण जाधव तिला फसवेल याची भीती होती. तो गुटखा खातो हे तिला माहीत नसावं.
मला जाधव थोड्याच दिवसांपूर्वी सायकल स्टँडवर भेटला होता. मी मराठेच्या पेपरला बेस्ट लक द्यायला आलो तेव्हा तो ही आला होता. मी ल्यूना आणली होती तर हा नेमका कायनेटिक घेऊन आलेला भाड्या.
मला कायनेटिक आडवा घालायला लागला तेव्हा मी सरळ म्हणालो “काय ते सरळ बोल. टाईमपास कशाला..”
”त्या मराठेशी तुझी फ्रेन्डशिप आहे काय ?” तो म्हणाला.
हगला नारायण तेच्या आयला. याला सोन्ड्याला कुठून कसली शंका आली होती ?..जाधवची गँग लांब उभी होतीच. आणि ती मागे लागली तर मला कॉलेजात येणं जाणं पण हराम झालं असतं.
“हो” मी एवढंच म्हणालो.
”नुसती फ्रेंडशिप ..की लव्हशिप?”
मला तिथे राडा सीन करायचा नव्हता म्हणून मी म्हटलं “तुला काय करायचंय ? तू आहेस का तिच्या मागे?”
“करायला भरपूर करता येईल. पण आपल्याला मध्ये आडवा येण्याची सवय नाही. तू फक्त सांग. तुझी आहे का? “
“हो लव्हशिप आहे थोडी. तू तिच्यामागे वेळ वाया घालवू नको”. मी एवढंच म्हणालो.
“तुमची आहे तर मग ती मग ती आमच्याकडे का बघते? “
“ते तिलाच विचार ना दम असेल तर..”
जाता जाता पायावर पाय ठेवून एखाद्याचं नखुरडं उचकटावं तसं जाधवला सुनावून मी झटक्यात तिथून निघालो.
तरीही ते बेणं दुस-या दिवशी गेलं आणि क्लासजवळच्या सरोवर स्नॅकसमोर कायनेटिक मराठेच्या सायकल समोर घालून थांबलं.
तिच्याशी काय बोलला ते ऐकू आलं नाही पण नंतर कळलं की त्यानं तिची फ्रेंडशिप मागितली.
स्पष्ट कल्पना देऊनही त्यानं मराठेची फ्रेंडशिप मागितली होती. आता मी गप्प बसणार नव्हतो.
त्याच्याशी डायरेक्ट राडा करायचा तर ते अवघड झालं होतं कारण पाप्या पाटीलचा सगळा ग्रुप सध्या त्याच्या सोबत होता. कायनेटिक घेतल्या पासून तर तो पोरींच्या पुढे जाम स्पीड मारायचा.
मी पडलो ब्राह्मणाचा. मारामारी करायची म्हणजे नसती लफडी. म्हणून आता मराठेला काहीतरी सांगायला हवं होतं जाधवबद्दल. सावध करायला म्हणून चांगल्या हेतूनं मग मी सगळंच नीट सांगायचं ठरवलं.
रात्री परांजप्या, डीके आणि मोमीन घरी आले होते. फॉक्सीलेडीची कॅसेट डीकेनं आणली होती. माझी सेपरेट रूम आणि तीही वरच्या मजल्यावर असल्याने आमचा असल्या गोष्टींचा अड्डा बिंदास माझ्या खोलीतच पडायचा. ऐनवेळी ती कॅसेट व्हीसीआर मध्ये अडकली. गोटे जाम झालेले सगळ्यांचे. शंभर रुपये डिपॉझीटवर आणली होती. आणि डीकेनं कुत्र्यानं गणेश व्हिडीओ लायब्ररीत माझा घरचा नंबर दिलेला. म्हणजे परत नाही केली की मी मेलो.
मग साला चमच्यानं व्हीसीआर खोलला आणि टेप काढली.
पिक्चरमध्ये हवे ते दोनतीनच सीन होते. पिक्चर डबल निघाली. ट्रिपल नव्हती. फक्त वरचंच पूर्ण दाखवलं होतं. खालच्यावर चादर किंवा मग वरून कॅमेरा मारून लपवलं होतं.
फॉरवर्ड करत बघितली. हॉट सीनला इंडेक्स मार्क करून ठेवल्या म्हणजे परत आणली तर शोधायला नको म्हणून.
मला आणि परांजप्याला काहीच एक्साईट झालं नाही. आम्ही आधी ट्रिपल पण बघितली होती. डिक्या मात्र जाम पेटला होता. तो साला नेहमीच थोड्याने पेटतो नि जातो मग लगेच बाथरूम मध्ये.. उगाच नाही सगळे त्याला “चाचा हलवाई” म्हणत.
डीके नि मोमीन बरेच उशिरा कटले. मग मी परांजप्याशी बोलणं काढलं. त्याचं असं म्हणणं पडलं की मी मराठेच्या मोठ्या बहिणीला सगळं सांगावं. डायरेक्ट मराठेला सांगण्याऐवजी. जाधव तिच्या बहिणीवर डोळा ठेवून आहे म्हटल्यावर ती बरोबर सावध होईलच. जाधवविषयी वेगळं वाईट वंगाळ काही सांगत बसावं लागणार नाही. ती मोठी असल्यानं ती बरोबर शहाणपणाने मराठेला समजावेल.
त्यानं मला खात्री दिली की मराठे माझ्याकडे बघते. तसं त्यानं पूर्वी बघितलं आहे . मराठे ज्युनियरला होती. तिच्या वर्गात लेक्चरला जाऊन बसायचं धाडस आम्ही केलं होतं. पण अशा एखाद्या लेक्चरला आम्ही बसलो असं ब-याच दिवसांत झालंच नव्हतं म्हणून हल्ली ती माझ्याकडे बघते का ते कळायला मार्ग नव्हता.
मग दुस-याच दिवशी संध्याकाळी मी तिच्या बहिणीला गाठायचं ठरवलं. ती संतोष झेरॉक्स सेंटरवर रोज संध्याकाळी येतेच. संतोष बरोबर तिचं चालू आहे.
केमिस्ट्री प्रॅक्टिकल मोमिनच्या भरवशावर झटपट उरकून मी सटकलो. आधी घरी जाऊन हायड्रोजन सल्फाईडचा पादरा वास मारणारा शर्ट बदलला. थोडा वेळ शिल्लक होता. मग पटकन फॉक्सीलेडीचे मार्क करून ठेवलेले दोन सीन पाहिले. मग आंघोळ केली.
फॉक्सीलेडीमधल्या सीन सारखी बाथरूम मध्ये वाफ वाफ झाली होती. मजा आली.
कॅसेट परत करायची होती. ती डार्क रंगाच्या पिशवीत गुंडाळून घेतली. मग तिथे संतोष झेरॉक्सला जाऊन पाचलाच उभा राहिलो.
तशी माझी मराठेच्या घरच्यांशी ओळख होतीच. खूप कष्टानं काढलेली. तिच्या बहिणीला माझं घर नीट माहीत होतं. मराठे स्वत:ही माझ्या घरावरून अनेकदा गेली होती. मी कॉलेजात तिच्याशी बिंधास बोलण्याइतकी प्रगतीही केली होती. माझ्याकडच्या दोन तीन नवीन पाकिस्तानी गाण्यांच्या कॅसेटही तिनं ऐकायला नेल्या होत्या. तसा आमच्यात काही लोचा नव्हता. मस्त चाललं होतं. जाधव येईपर्यंत.
मराठेची बहीण सहाला आली. तोपर्यंत गोल गोल फे-या मारून माझी ल्युना बंद पडायला आली.
..आधीच आम्ही कायम रिझर्व्हवर चालवतो. वीस वीस रुपयांचं पेट्रोल टाकून. कारण आपण टाकी भरली की डिके बीके सारखे फुकटे कोणीतरी ल्युना मागून न्यायचे आणि रिकामी करून आणून ठेवायचे. आता बंद पडली असती तर भवानी पंपापर्यंत चालत जाऊन थम्सअपच्या बाटलीत पेट्रोल आणावं लागलं असतं.
ती आली ती संतोषला चिकटली. त्याच्यासमोर मला काहीच बोलता येईना. मी लायसनची झेरॉक्स काढायला दिली. संतोष पाठ वळवून गेला तेव्हढ्यात मी तिला पटकन म्हणालो “मला तुझ्याशी बोलायचंय. उद्या घरी ये. “ ती थोडी हसली, आणि नुसतीच बघत बसली.
“नक्की ये” मी म्हणालो.
तेव्हढ्यात संतोष आलाच परत. मग मी तसाच निघालो.
आयची सडली डाळ साली…तिनं किती वाजता घरी यायचं ते ठरवलंच नाही. मग दुस-या दिवशी दिवसभर घरात बसणं आलं.
मी मग घरातले सगळे गेल्यावर गुड डे बिस्कीटचा पुडा घेऊन आलो. कॉफी आणि बिस्कीट असा प्लॅन ठरवला. मग काय काय सांगायचं ते विसरू नये म्हणून एका पॅडचा कागद फाडून घेतला आणि लिहायला बसलो. पॅडसकट लिहिलं तर खालच्या पानावर दाबून अक्षरांच्या खुणा राहतात.
दुपारचे तीन वाजले तरी ती आलीच नाही. मला एक तर घरात शर्ट घालून बसायला फार त्रास होतो.. बेंबीला हवा लागल्याशिवाय चैन पडत नाही. तरी मी पाच तास हिरवा शर्ट घालून बसलो होतो. तो नवीनच आणला होता आणि मराठेपुढे घालण्यासाठी घडी तशीच न मोडता ठेवली होती. पण आज घातला. चुकून मराठे पण आली तर तिच्या बरोबर?
साडेतीन वाजता मी वैतागून गुड डे ची दोन बिस्कीटं खाल्लीच. आता ती येण्याची शक्यता कमी होत चालली होती. अस्वस्थ वाटत असल्यानं मी जेवलोही नव्हतो. सगळा दिवस खराब केला होता या भिकारचोट जाधवनं.
पाच वाजता परांजप्याला फोन केला. मग खूप वेळ नीट चर्चा करून असं ठरलं की उद्या तिच्या बहिणीच्या कराटे क्लासच्या रस्त्यात सहज म्हणून गप्पा मारत थांबायचं आणि ती आली की थांबवून बोलायचं. ती आली की परांजप्या थोडावेळ कटणार होता माझी ल्युना घेऊन.
मग मी वीसच रुपयांचं पेट्रोल गाडीत घातलं. कराटे क्लासच्या जवळ मी आणि परांजप्या उभे राहिलो. हे सगळं नीट झालं की मी परांजप्याला संध्याकाळी ओमलेट सँडविच घालणार होतो.
संध्याकाळी मात्र ती तिच्या पांढ-या सनी वरून कराटे क्लासला आली. मी तिला ‘हाय’ केलं. मग ती थांबलीच.
“मी आलोच पेट्रोल टाकून” असं म्हणून परांजप्या माझी ल्युना कुथवत सटकला.
खोटारडा साला. पेट्रोल टाकून नाही, पेट्रोल संपवूनच येणार होता भोसडीचा. याला काय आज ओळखतोय का?
“काय म्हणताय?” ती हसत म्हणाली.
तिच्या बहिणीवर येऊ घातलेलं संकट तिला माहीत नाहीय्ये म्हणून हसतेय..जाऊ दे. असं म्हणून मी थोडं खाकरून मुद्द्यावर आलो.
“जाधव म्हणून एक थर्ड क्लास पोरगा आहे. तो जरा तुझ्या लहान बहिणीच्या मागे लागला आहे असं दिसतं.”
“हो का?” ती म्हणाली.
“हो. तो गुटखा खातो…कायम तोंड भरलेलं.. “
जाधवचा दुसरा वाईट मुद्दा मला पटकन मांडता येईना. पण पॉज घेऊन चालणार नव्हतं.
“तो वाया गेलेला मुलगा आहे. गाड्या उडवतो. मलाही धमक्या दिल्या आहेत त्यानं.. “
“तुला धमक्या? कशाला?” ती भसकन म्हणाली.
मी दचकलो. खरंच..मला धमक्या कशाला हे कसं आणि काय सांगणार?
“ते जाउंदे. मेन म्हणजे मी म्हटलं तुला एकदा सांगावं. त्याच्यापासून दूर राहिलेलं बरं नं?”
ती पुन्हा हसली. मला कळेना हिला काय मजा येतेय की काय?
“मी बघते..थँक्यू..” एवढंच म्हणून बुर्र करत ती सनी पायानं ढकलून चालू पडली.
परांजप्याला ठरल्याप्रमाणे सेंट एन्ड्रूज कडे घेऊन गेलो.
सेंट एन्ड्रूज म्हणजे आनंदराव. ओमलेट सँडविचवाला. मूळचा कोंकणातला आहे, सैतवडयाचा. मीही कोंकणातलाच असल्यानं मला तो फार आवडतो. त्याला हे माहीत आहे की मला सँडविचमध्ये ओमलेट थोडं कच्चं ओलं लागतं आणि टोमॅटो अजिबात चालत नाही. टोमॅटोने लडबडाट फार होतो. अंड्यातलं पिवळं मोडलेलंही मला अजिबात आवडत नाही.
एन्ड्रूजचा गोड मिष्ट चहा आणि ओमलेटचा तोंडातला कहर याची धुंदी बाजूच्या अंधारात जाम चढत चालली होती. तेव्हढ्यात एकदम मराठेच तिच्या बाबांच्या मागे चेतक वर बसून जाताना दिसली. बाजूच्या ग्रुप मधला एक खेमडा पोरगा तिच्याकडे बघून ओरडला.. “माझी आयटेम गेली बघ..”
“आयचा घो..” मी मूळ कोंकणातल्या शिव्या अजूनही जपून ठेवल्या होत्या.
“लाईन मारणारे आहेत तरी किती जण हिचे.
तीनचार दिवस निरश्या दुधासारखे बेचव गेले. आणि एका संध्याकाळी बघितलं तर सरोवर स्नॅक समोर जाधव कायनेटिक लावून उभा होता आणि मराठे त्याच्यासमोर एक पाय त्याच्या कायनेटिकवर ठेवून काहीतरी बोलत होती.
माझ्या डोक्यात शॉट बसला. शाळेत पुस्तकात धडा होता त्याप्रमाणे “जैसे भडबुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडाका जाहाला.” अशासारखा आवाज डोक्यात झाला. आयला…शॉक..
मराठेनं जाधवला फ्रेंडशिप दिली? इतकी कल्पना असूनही? तो गुटखा खात असूनही ? तोंडाला गुटख्याचा भपकारा मारणारा तो जाधव तिला आवडला? गुटखागालफडी भडभुंजा साला..
गॅद्रिंग मध्ये “तू मिले दिल खिले” गाणं या जाधवानं म्हटलं होतं त्यावर इम्प्रेस झाली काय? मोने मॅडमनी सिलेक्शनच्या वेळेलाच त्याला बाहेर काढलं होतं, पण दादागिरीच्या जोरावर स्टेजवर उभा राहिला साला. गुटख्यानं जीभ जड झालेली. “तू मिले” ऐवजी “सू मिले” म्हणत होतं सोंडगं..
आणि त्यावर भाळून त्याला मराठे पटावी ? आम्ही निर्व्यसनी आहोत त्याचा काय उपयोग मग ?
साली इमेज चांगली ठेवायची म्हणून शिव्या ओठांवर येऊ देत नाही. सिगारेट ओढत नाही. साधी बियर पण घेत नाही. तरी त्या सगळ्याची किंमत काय?
मला ते सहन होईना. तोंडाची चव गेली. अँड्र्यूकडे ओमलेटमध्ये मसाला जास्त सांगितला. तरी नुसती जिभेची आग झाली, पण चव नाहीच. मग परांजप्या तिथे अचानक उगवला.
वासूगिरी करत करत पोचला असेल अँड्र्यूच्या गाडीवर. पण मला खूप बरं वाटलं. वेळेवर धावून आला साला.
पहिले परांजप्याला म्हटलं “परांजप्या.. आज बियर प्यायची रात्री..साईकृपा मध्ये..”
तो चमकून बघतच राहिला. मग फाद्दकन हसला. पोरींसारखा..
त्याला सगळी कहाणी सांगताना चहा थंड झाला. पण मला पर्वा नव्हती. मराठेला जाधवपासून वाचवल्याशिवाय मला आता झोप लागणार नव्हती.
मग परांजप्या मला अचानक ढम्मकन म्हणाला “तिच्या बहिणीने तुझा निरोप तिला सांगितलाच नसेल तर?”
ही हॅड अ पॉइन्ट..तिच्या बहिणीने मला सिरीयसली घेतलंच नसेल. नाहीतर मराठे इतकी बेफिकीर राहिली नसती.
तिला स्वत:च सगळं सांगायचं असं ठरवल्यावर मला थोडं हलकं वाटलं आणि मी एक कमी तिखट ओमलेट सँडविच सांगितलं.
“खाऊन खाऊन फुटशील डुकरा..” परांजप्या म्हणाला. मी लक्ष दिलं नाही.
रात्री आम्ही साईकृपामध्ये गेलो पण खरोखरच बियर मागवण्याचा दम आमच्या गांडीत नव्हता. ऐनवेळी आम्ही शेपूट घालून हगलो आणि गोबी मांचुरियन खाऊन बाहेर पडलो.
मग मी ठरवलं की आपलाही काहीतरी वचक जाधवला आणि एकूणच इतर पोरांना वाटायला हवा. तुम्ही आडवे पडलात की साले सगळे चढतात तुमच्यावर. मला उभं रहायला हवंय.
दुस-याच दिवशी मी कुत्रं फिरवायला म्हणून गेल्यासारखा त्या कराटे क्लास कडे गेलो.
चौकशीसाठी आत जायचं तर ब्राउन्याला कुठेतरी बांधायला हवं होतं. कराटे क्लासच्या कुंपणाला बांधून आत गेलो आणि फी वगैरे विचारून लगेच बाहेर आलो.
तेव्हढ्यात कुत्र्याच्या अवलादीनं भुंकून भुंकून आणि साखळी ओढून ओढून कुंपणाची तार उखडून पंधरा फूट बाहेर काढलेली.
त्याच्या कानाखाली दोन ठेवून दिल्या आणि कराटेच्या सरांना सॉरी म्हणून “उद्यापासून येतो” म्हणून सांगितलं.
To be continued..

No comments:

Post a Comment